Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Tuesday, March 24, 2009

आयुष्या...

मला जे पाहिजे ते मी कधी करणार आयुष्या?
तुझ्याशी भांडण्यातच वेळ जातो फार आयुष्या

कितीदा चेहरा बदलून सामोरा तुला आलो
नवा तू घेतला प्रत्येकदा अवतार आयुष्या!

जसे करणे तसे भरणे असा जर कायदा आहे
तुझ्या वाट्यासही असले जिणे येणार आयुष्या!

अखेरी लागल्या रंगायला ह्या मैफली माझ्या...
अखेरी ऐकता आला तुझा झंकार आयुष्या

तुला सोडून जाताना मला का वाटली हळहळ?
कधी होता तुझा माझा सुखी संसार आयुष्या?

अरे इतक्याच साठी जाळला मी जन्म हा सारा
जराही सोसला नसता तुला अंधार आयुष्या!

Monday, October 20, 2008

प्रश्न...

(मायबोली.कॉम वर आयोजित दुसर्‍या गझल कार्यशाळेत लिहिलेली गझल)

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले... कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

Thursday, April 17, 2008

पोहरा...

पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!

उगीच ना मी थांबवले अर्ध्यातच गाणे
त्यावेळी सूर नेमका कापरा निघाला!

ज्याने सावरले तो नव्हता कुणीच माझा
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला

असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला

शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला

चालवती जे देश तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला!

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला ?

वणवा...

(मराठीगझल.कॉम वर आयोजीत कार्यशाळेत लिहिलेली गझल)

हुंदका साधा तुझा सांगून गेला,
शब्द माझा केवढा टोचून गेला!

मी कधी ना घेतले चाळून कोणा
भेटल जो, तो मला गाळून गेला

कोणती इच्छा अशी धरली मनी तू ?
पापणीचा केस खंतावून गेला!

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

हा खुलासा मागती आक्रंदणारे
’तो चितेवर का असा हासून गेला ?’

ज्यास मी होत्या दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला!

किनारे...

(वैभव जोशी यांनी मायबोली.कॉम वर आयोजीत केलेल्या कार्यशाळेत लिहिलेली गझल.)

ऋतू येत होते, ऋतू जात होते
तरी ताटवे मग्न झुरण्यात होते!

म्हणाया तुझे आटणेही अकाली...
तुझे दाटणेही अकस्मात होते!

समजण्या मला लागला वेळ थोडा
तुझे प्रेम लपले नकारात होते!

मला सांग होता कसा दोष माझा ?
जरी ओठ माझे, तुझे दात होते!

तरसलो जरी मी, बरसलेच नाही
खुजे मेघ त्या आसमंतात होते!

तिथे पाहिली दानवांचीच सत्ता
तिथे देव नुसते पुराणात होते!

इथे कोणती लाट घेऊन आली ?
किनारे मला हे कुठे ज्ञात होते ?